१९. देसाई काका

आज रविवार,
देसाई काका काल शनिवारी गेले
“आपला कोणाला त्रास नको, काय?”
“अगदी इथे वरच ठेवली आहेत”
देवघराच्या जवळच्या कप्प्यातून दोन सर्टिफिकेट्स काढत काका म्हणाले होते
काका आणि काकू - दोघांची देहदानाची सर्टिफिकेट्स !
बहुतेक लॅमिनेटही करून ठेवली होती
काकांचे सगळंच आटोपशीर
राहायचेही टॉप
थंडी असेल तर स्वेटर
बाकी नेहमीच - इस्त्रीचा ड्रेस आणि पायात बूट
आमच्या दोन मजले खालीच काका राहत असल्यामुळे, आम्ही शिफ्ट होऊपर्यंत काकांशी संपर्क जवळपास रोजचाच!
बाणेर पाषाण लिंक रोड वरच्या बऱ्याच सोसायट्यांमध्ये काकांचा राबता असे,
गेट वरच्या वॉचमन आणि भेटलेल्या प्रत्येकाच्या हातावर अत्तराचा थेंब लावत
लहानग्यांच्या हातात एखादा बदाम किंवा एखादी टॉफीगोळी दे
असं करत करत काकांची फेरी चाले
आणि
“रडू येतं हो”
“खूप प्रेम करतात लोकं”
वर असं काकाच आम्हाला सांगत, सांगताना खरंच डोळ्यात पाणी येई त्यांच्या!!
जवळपास दहा वर्षांपूर्वी काकू आणि ते मुंबईवरून पुण्यात शिफ्ट झाले
घरातलं मोजकंच पण अतिशय कल्पकतेनं केलेलं फर्निचर
गॅलरीतली छोटीशी बाग
आणि एकूणच घर आणि बाग कशी मेंटेन करायची याच्या वेगवेगळ्या टिप्स ते देत
“याला काय आहे, तंबाखूचा स्प्रे मारायचा म्हणजे कीड पडत नाही” - बागेकडे अभिमानाने पाहत काका सांगत

काकूंच्या खूप आधी, जवळपास ४० वर्षांपूर्वीच रिटायरमेंट घेऊन काका समाजात ऍक्टिव्ह झाले!
काका आणि काकू मिळून भारत आणि विदेशात खूप फिरलेले असल्यामुळे
आणि उदंड लोकसंपर्क आणि कदाचित लोकांच्या नकळत केलेल्या बर्याचश्या सामाजिक कार्यामुळे आलेला भरपूर अनुभव यामुळे
काकांना तुम्हाला काय सांगू आणि काय नको असे होई

आपल्यावर देवाचे फारच उपकार आहेत असं ते सांगत
“काही नाही हो …”
“शुगर नाही”
“ब्लड प्रेशर नाही”
“संधिवात नाही”
“अगदी काही नाही! खूप उपकार आहेत त्याचे” (आकाशाकडे बोट)
काकूंना घेऊन दर काही दिवसांनी आळंदीला जात
अनेक श्लोक आणि सुभाषितं पाठ, त्या त्या वेळी लगेच आठवतही असत
भगवदगीता सुद्धा मुखोद्गत, पद्धतशीर परीक्षा वगैरे देऊन काकांनी पहिला नंबर पटकावला होता !
लोकांना ज्ञानेश्वरी कळावी यासाठी अगदी युट्युब चॅनेलही काढले होते!
काका कायम आनंदीच समोर येत,
अगदी एखाद्या मिनिटासाठी भेटले
तरीही एखादं जबरदस्त वाक्य ऐकायला मिळे
“सुखापेक्षा समाधान मिळतेय का ते पहा”
हे त्यांचं वाक्य असंच जिन्यातल्या येत्याजात्या संवादातलं !
काकांना छोट्या गोष्टींचेही खूप अप्रूप असे
दिवाळीत दिलेला फराळ, किंवा बायकोनं काकूंना काढून दिलेली रांगोळी किंवा मी केलेली अगदी छोटीशी मदत
आपल्याला संकोच वाटेल इतकं भरभरून कौतुक करत असत ! - तेही जाहीर आणि अनेकदा !
आपल्या आजूबाजूची लोकं बाहेरून कशीही वागली तरी … ती आतून कशी खूप चांगलीच आहेत हे पटवण्याकडे त्यांचा ओढा असे !
दोघांचा मुख्य आधार म्हणजे त्यांचीच इथे जवळ राहणारी भाची आणि तिचे मिस्टर
त्यांच्याविषयी दोघेही भरभरून सांगत !!
इतकंच काय, त्यांच्या नात्यातल्या कुठल्याही समारंभाची माहिती आणि फोटोज काका आम्हाला आम्हीपण त्यांच्या कुटुंबातलेच असल्याप्रमाणे पाठवत, “क्षणचित्रे” असा आशय देऊन !
सोसायटीतले गणपती, दिवाळी, होळी, २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट म्हणजे काकांचे जणूकाही पर्सनल सण !
१००% सहभाग आणि वर फोटोग्राफरची जबाबदारीही ते पार पाडत !
खड्या स्पष्ट आवाजात राष्ट्रगीत किंवा आरती, शुद्ध आणि पूर्ण म्हणणे म्हणजे - काकाच !
कार्यक्रम झाला कि सगळ्यांना व्हाट्सऍप वर फोटो पाठवत !
समोर आले की “हरिओम” किंवा नमस्कार आणि
आपण त्यांना काहीही मेसेज केला कि - किंवा त्यांचा आला तरी शेवटी
“तुम्हाला शुभेच्छा 🌹”
या आशयाचा गुडबाय नेहमी असेच !
तर …
असो,
काका काल त्यांच्या देवाकडे गेले
विकेंडच असल्यामुळे
नेहमीप्रमाणं
आपला कोणाला काही त्रास नको,
याची जाताना सुद्धा काळजी घेऊन गेले!
-निखिल
(चित्रे - स्व. श्री. अशोक देसाई यांनी पाठविलेल्या चित्रांमधून घेतली आहेत)