१७. हिर आसमानी

“असल्या डाउट्स साठी माझ्याकडे येऊ नकोस!”

दिवसभरातून एकदा तरी पीट मला असा फटकारत असे.

मी प्रोजेक्ट मध्ये नवीन असल्यामुळे, जमेल तितकं नॉलेज घ्यायच्या प्रयत्नात असे.
बाकी जुनी लोकं मदत करत, पण पीट मात्र जवळपास हाकलून लावत असे.

सव्वासहा फूट उंची आणि रुंदी सुद्धा जवळपास तीन साडेतीन फूट असा भारदस्त पीट आमच्या अजस्त्र फ्लोअरच्या एका कोपऱ्यात बसे.

अमेरिकन नेव्ही मधून फायटर पायलट म्हणून रिटायर झाल्यानंतर त्यानं नेव्हीसंबंधितच फ्लोरिडामध्ये असलेलं आमचं प्रोजेक्ट जॉईन केलं होतं. त्यामुळे जवळपास सगळ्यांनाच त्याच्याकडे काही बाही कामासाठी जावं लागे.

आणि आम्ही सगळेच त्याच्यापेक्षा कमीत कमी पंधरा - वीस वर्ष लहान, आमचे प्रश्नही (त्याच्यामते) बालिश असत.
वर आम्ही नेव्ही च्या लोकांना रिप्लाय करताना नेहमीच्या IT च्या सवयीने करत असू. म्हणजे “हॅलो ऍडमिरल डग्लस” लिहायच्या ऐवजी “हाय डग्लस” !!!. सर मॅडम वगैरे तर लांबच !

आम्हाला तो बहुदा दोन हात लांबच ठेवत असे. माझ्यासारख्या नवख्या लोकांचा त्याला विशेष राग असे. कारण आम्ही फक्त प्रश्न विचारतो बाकी कामे शून्य असे त्याचे मत होते आणि तसं तो बोलूनही दाखवत असे.

त्याच्या क्युबिकलभोवती येणारा कॉफीचा मस्त दरवळ सोडला तर बाकी त्याच्याकडे जायचं म्हणजे मला जाम दडपण येई.

माझ्या मित्राची, तरुणची बहीण एअर फोर्स मध्ये पायलट चे ट्रेनिंग घेत होती तेव्हा त्याने मला सांगितलं होतं -

“तुला माहित आहे का? फायटर पायलट्स ला बाईक चालवताना विशेष काळजी घ्यावी लागते”
“का रे?” - मी
“विमान ताशी दीड हजार किलोमीटर च्या स्पीड ने उडते. आणि ते उडवून हे बाईक वरून हॉस्टेल वर निघतात” - तरुण
“मग?” - मी
“अरे, ते स्पीड वाढवतच राहतात आणि बाईक दीडशे च्या स्पीड वर असली तरी त्यांना स्लो मोशन मध्ये वाटते, आणि त्यात त्यांचा अपघात होऊ शकतो !”

हे ऐकून, फायटर पायलट्स म्हणजे काहीतरी वेगळंच रसायन असतं असं माझं मत झालं होतं

आणि त्यामुळेच पीटचे तुसडे वागणे सहन करत माझी प्रोजेक्टमध्ये वाटचाल चालू होती

एक दिवस असाच घाबरत मी पीटच्या डेस्कवर गेलो, आणि मागच्या बऱ्याच आठवड्यांच्या कामानंतर प्रोजेक्ट मधले काही इशूज आणि त्यांची सोल्युशन्स मी त्याच्या लक्षात आणून दिली

“तुला म्हणायचेय कि दोनशे रिपोर्ट पैकी फक्त दहा एक रिपोर्ट नेव्हीकडून वापरले जातात ?” - पीट
“हो” - मी
“आणि त्यातल्याही इतक्या रिपोर्ट्स मध्ये चुका आहेत ?”
“हो” - मी
“आर यु शुअर, निखाईल ?” - तो माझे नाव काहीही घेत असे, पण मी काही बोलायचो नाही
“हो” - मी
“तू फक्त एका शब्दात उत्तर देऊ नकोस हे सिरिअस आहे, नेव्ही चा खुपसा डेटा आपण उगीचच इकडे तिकडे पाठवत आहोत !” - पीट
मग मी त्याला सगळे उलगडून समजावून सांगत गेलो.
“धिस इज रेडिक्युलस, हे कोणाला कळले कसे नाही आत्तापर्यंत !”
“तू चल, आपण हे वरच्या लोकांच्या आणि नेव्ही च्या कानावर घालू”
“मी कशाला ? तूच सांग, डिटेल्स दिलीयेत मी तुला सगळी, काही वाटलं तर मला बोलव” - मी,
इंग्लिश मध्ये आहो जाओ करता येत नाही. मला पीटला you म्हणून संबोधने कसेसेच वाटायचे!

“नाही चल तू! मस्त काम केले आहेस !”

पीटच्या डोळ्यात कधी नव्हे ती एक चमक दिसली आणि माझ्याविषयीचं थोडं कौतुकही !
मला अगदीच हुश्श वाटलं !

त्यानंतर मग पीट माझ्याशी बऱ्यापैकी छान बोलू लागला

त्याच्या रागीट स्वभावामुळे फारसं कोणी त्याच्याशी बोलत नसे.
फार सकाळीच तो ऑफिसमध्ये येई
दिवसभरातून बऱ्याच कॉफ्या रिचवत तो काम करत असे
शिळोप्याच्या गप्पा वगैरे शून्य !
क्वचित कामातून डोकं वर काढलं तर ते आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला !

नेव्हीतून निघाल्यापासून बराच लठ्ठ झाला होता
आणि त्यामुळे लागलेल्या काही शारीरिक व्याधीही त्याला वैतागवत असत
बऱ्याचदा काठी किंवा काही आधार घेऊन चालत असे
संध्याकाळी त्याची बायको, सॅन्ड्रा, एका मोट्ठ्या एसयूव्ही (टाऊन अँड कंट्री) मधून त्याला घ्यायला येई
आणि तिथपर्यंत जाईस्तोवरही त्याला धाप लागे


काम नसलेल्या एका बऱ्यापैकी निवांत दुपारी मी तरुणने सांगितलेला किस्सा त्याला सांगितला

“खरंच तुम्हाला बाईक चालवू देत नाहीत का?” - मी
पीट हसला,
“तुला अजून काहीच माहित नाही !, बस”
“अरे माझं जेट म्हणजे माझी पहिली गर्ल ! फक्त ती आणि मी !”
“आणि अकॅडमी मध्ये लगेच काही जेट मिळत नसते, त्याच्या आधी साधी सेस्ना विमाने असतात”
“आधी स्टॅंडर्ड पायलट ट्रेनिंग, ती पण एक मजाच असते”
पीट एव्हाना अकॅडमीत जाऊन पोचला होता !
“हो ! काय काय मजा केलीयेस तू” - मी
“तुम्ही सनसेट चे फोटो काढता कि नाही ऑफिसच्या काचेमधून”
“हो मग?”
“मी एकच सनराईज आणि सनसेट तीन तीन वेळा अनुभवायचो !”
“कसा?”
“आधी विमान खूप उंच घेऊन जायचे, मग तिथे सनराईज झाला कि ते खाली आणायचे हजार एक फूट”
“मग तिथे सनराईज पाहायचा! मग परत एकदा हेच करायचे”
“अच्छा ! म्हणजे जो माणूस वर डोंगरात असतो त्याच्यासाठी सूर्योदय लवकर होतो मग खालच्या सपाटीच्या लोकांसाठी तो होतो, तसं काहीसं” - मी
“देअर यू गो ! आणि सनसेट ला नेमके उलटे आधी विमान खाली, मग वर वर नेत राहायचे”
“आहे खरी मजा” - मी

पहिल्यांदाच पीटला इतके खुललेले पाहून अजून एक दोघांची भीड चेपली आणि तेही येऊन पीट च्या क्युबिकल भोवती गोळा झाले
पुढचा तासभर पीट ने काय काय मजा केलीये ते ऐकताना सगळ्यांनाच आपण काहीच मजा नाही केली असं वाटून गेलं !

बायकोचा पाचव्यांदा फोन आला आणि पीट सगळ्यांना बाय करून निघाला

“मी येतो गेट पर्यंत”
“काय तूपण सुरु केलंस”
गेट वर लोकं सिगरेट ओढत, दोन बोटांनी सिगरेट ओढण्याची खूण करून त्यानं विचारलं
“नाही, आय विल से हाय टू सॅन्ड्रा”, मी म्हणालो.
“चल मग”

गाडीजवळ पोचल्यावर पीटनं सॅंड्राला छान मिठी मारली
तिनं सवयीनं त्याची काठी आत ठेवली

“यु नो, सॅंड्राला सेस्नातल्या त्यादिवसाच्या चौथ्या सनसेट वर प्रपोज केलं होतं”
“अल्मोस्ट थर्टी इयर्स अगो !”
“आणि तेव्हापासनं सगळे सिंगल, डबल, ट्रिपल सनसेट तिच्याबरोबरच झालेत”
“शी इज अ फँटॅस्टिक गर्ल”
“पण हि दुसरी … पहिली कोण तुला सांगितलं आहेच मी”, हसत तो म्हणाला
सॅंड्रा सुद्धा ते माहित असल्यासारखी खळाळून हसली आणि झुर्रर्र करून यु टर्न मारून ती ढालगज गाडी तिनं सहज गेटबाहेर काढली.

जमीं वालोंको समझ नाही आनी ।
मेरी हिर आसमानी .. मेरी हिर आसमानी ।।

फायटर पिक्चर मधल्या या गाण्यात,

विमानाला “आसमानी हिर” (आणि वैमानिक म्हणजे रांझा 😀) असं म्हंटलंय !!

आम्हा जमिनीवरच्या लोकांना पीटनं त्या दिवशी त्याची हिर समजावून सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला

कालांतरानं प्रोजेक्टमधली लोकं बदलत गेली. पीटचं तसं कोणाशीच जमत नसल्यानं बहुदा त्याला नारळ देण्यात आला.

आता या गोष्टीलासुद्धा बरीच वर्षं झाली

पण एखादा सनसेट
किंवा असं एखादं गाणं

मला पीटच्या क्युबिकलमध्ये घेऊन जातं
कॉफीचा मंद दरवळ येतो

आणि मग पीटचा आवाज ….

मिस्टर निखाईल …
यु आर हिअर …
वन्स अगेन …

टेल मी …

-निखिल

comments powered by Disqus

Related