१४. रे कबीरा …

मदर्द, आरजू, उल्फत, इकरार
आणि
आगोश
आणि ….
कित्येक असतील,

गाण्यांत सहजपणे येणारे उर्दू/ उर्दूईश शब्द लगेच उलगडून सांगायला पूर्वी गुगल नव्हतं खेरीज मोठ्यांना विचारायची सोय नव्हती, त्या वयापासून मी अशा बर्याच हिंदी गाण्यांचा भक्त आहे. आताही त्यातली बरीचशी गाणी मी अर्थाच्या मागे न लागताच ऐकतो. पण कधी कधी अर्थ समजणं अगदीच कम्पलसिव होऊन जातं, अगदी काहीतरी मोठ्ठं मिस होतंय कि काय असं वाटेपर्यंत,

कैसी तेरी खुदगर्जी
ना धूप चुने ना छाव
कैसी तेरी खुदगर्जी
किसी ठोर टिके ना पांव ।

हम्म, खुदगर्ज म्हणजे ? बर्याचदा ऐकलाय …
पण कळतंय कळतंय, हा हिरो कनफ्यूझ्ड असेल …. धड इकडे ना तिकडे ….

मस्त मौला मस्त कलंदर
तू हवा का एक बवंडर
बुझके फिर अपने हि अंदर
क्यों रह गया ……

… दोस्ता तुझं सगळं आपलं आपल्यातच,
तसंच ठरवलं होतंस ना ?
मग
हि आतली वादळं आतंच मिटवतांना का बरं इतका
दमलायंस ?

रे कबीरा मान जा ….
रे फकीरा मान जा ….
आजा
तुझको पुकारें
तेरी परछाईंया ।

ऐक रे …
झालं गेलं ठीकाय
ये तू परत आमच्यात
तू जिथे सोडून गेला होतास ना ?
आम्ही अजूनही तिथेच आसपास आहोत
ये रे
सगळे थांबलेयत ….

आता सांगा ….
अडलं का काही ?
खुदगर्ज चा अर्थ कळल्याशिवाय?
नाही ना ?
नाही ना ?

हो हि …. आणि नाही हि …

खुदगर्ज - स्वार्थी, सेल्फीश

अगदी फक्त प्यूअरली स्वतःच्या स्वार्थासाठी निघून गेलेल्यासाठीसुद्धा जीवाची माणसं कित्ती जीव टाकतात,
म्हंटलं तर या एका शब्दावर गाणं फिरतंय, म्हंटलं तर नाही,
वाचा वाटलं तर परत ….

आणि मग आठवून पाहा आहे का
असं कोणी ?
कौतुक करणारं,
पण लांब आलात
आणि
आता खूपच लांब वाटणारी माणसं
दर वेळी कारणांची लिस्ट मांडता बिचार्यांपुढे
आमचे फ़र्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स … सुट्टी नाही …. किंवा विजा !
ती फसवणूकही कौतुकानं ऐकणारी लोकं (आणि पुढच्या वेळी नक्की भेटूवाली)
अगदी लांब कुठे राहणारी जाड पण मऊ चपात्या करणारी आत्या?
सुरकुतल्या हातांचे आजोबा ?
तुमचं धूम अप्रूप असणाऱ्या शाळेतल्या बाई
आणि जिच्या मदतीनं इंजिनीअरिंग पास झालात अशी थोडी मागे पडलेली,
कधीकाळची घट्ट मैत्रीण
किंवा मग
आई बाबा … भाऊ बहिण … वगैरे गृहीत धरलेलं पब्लिक ?

कधी नकळतपणातून आणि कधी कधी नाईलाजातून
किंवा अगदी दुर्लक्षातून असं होत असेलही पण,
खुदगर्ज आहोत खरं, थोडं बदलायला हवं
अगदीच बेटावर अडकायचो नाहीतर… काय ?

एनीवे
असो

जड झालं, ट्रॅक बदला

एक आहे
किचकट गणितं, शब्दांचे नेमके अर्थ माहित असणं, झालंच तर शंभर लोकांसमोर उभं राहून बोलता येणं आणि कवितेचं रसग्रहण करता येणं या अगदी शालेय गोष्टींशिवाय काय अडलंय ?
परत तेच
म्हंटलं तर अडतं, म्हंटलं तर नाही :)

परवा निघालो होतो,
गाडी काढली कि बर्याचदा बायकोच “मार्ग"दर्शक (GPS होल्डर) आणि डीजे असते, माझी आणि हिची गाण्यांची चॉईस जनरली नाही जुळत, माझ्या गाण्यांनी ती अगदीच बोरावते, आणि माझ्यामते तिची गाणी फारच उथळ असतात, तरं नेहेमीप्रमाणे थोडं तीचं थोडं माझं असं गाणं मिळाल्यावर त्यावर स्थिरावली,

जिसको दुवाओं में मांगा
तू हैं वही रेहनुमा …।

बा : रेहनुमा म्हणजे माहितेय का तुम्हाला ?

मी : नाही

बा : रेहनुमा - गाईड - मार्गदर्शक

मी: बरं :)

-निखिल

comments powered by Disqus

Related