१०. माफ

मी माफ करायचं ठरवलंय
ज्यांच्या मागे वेड्यासारखं धावलो … धावतो
आणि
त्याचं सोयरसुतक नसलेल्या दगडांना.

मी माफ करायचं ठरवलयं
केसांनी गळा कापनाऱ्यांना
पाठीत खंजीर खुपसानाऱ्यांना
आणि
शब्दांनी रक्तबंबाळ करणाऱ्यांना…

ज्यांनी त्रास दिला त्यांनाही .. माफ ..
आणि प्रेमाने बांधून पंख कापू पाहिले त्यांनाही माफ
जे दुरूनच हसत होते त्यांनाही माफ
जे जवळ येऊन डिवचून गेले त्यांनाही माफ

आता सगळ्यांनाच माफ करतोय तर
बऱ्याचदा
वेळी नाही म्हणू न शकलेल्या
आणि कितीदा हवं तेव्हा हो न म्हणू शकलेल्या
खेरीज,
न येणाऱ्यांची वाट बघत
आयुष्याच्या बऱ्याचश्या वळणांवर थांबून मागे बघणाऱ्या,
जे मला आवडतात त्यांच्यासाठी
ज्यांना मी आवडतो त्यांच्यावर
नकळत
अन्याय करणाऱ्या, स्वतःलाही
आज माफ करायचं ठरवलंय.

-(निखिल पुरवंत)

comments powered by Disqus

Related