१८. खच्ची

ख
डकीतल्या ओल्ड ग्रॅन्ट बंगल्यांविषयीची बातमी वाचली आणि मन जवळपास तीस - पस्तीस वर्षं मागं गेलं.
अर्थात, एकूण पुण्यातच गर्दी फार नसे आणि खडकीला तर पुण्याचे आऊटस्कर्ट्स मानलं जाई, मी शिवाजीनगर ला असलेल्या माझ्या शाळेत कितीही उशिरा गेलो तरी, खडकी वरून आलोय इतकं सांगून शिक्षा टळत असे .
त्यामुळे खडकीत तर सगळंच अगदीच निवांत आणि मुख्य म्हणजे ऐसपैस.
आर्मीचे जवळपास पन्नास एक बंगले या एरियात आहेत, जवळपास एक एकरात एक बंगला ! कोणी म्हणे कि नव्यान्नव वर्षांच्या कराराने हे भाड्यानं दिलेत, कोणी आणि वेगळं काही सांगे
पण आम्हाला मात्र या बंगल्यांच्या आवारातल्या पटांगणात खेळणं सोडून बाकी काहीच महत्वाचं नसे. बंगल्यांच्याच आजूबाजूला ऍम्युनिशन फॅक्ट्रीत काम करणाऱ्या आणि राहायला कॉलनीत जागा न मिळालेल्या किंवा रिटायर्ड लोकांची अगदी छोटी छोटी घरं होती, त्यामुळे खेळायला मुलांची कधीच वानवा नसे.
जवळपास प्रत्येक रविवारी आणि दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्टीत पटांगणात चाललेल्या मॅचेस आणि जवळच एखाद्या अजस्त्र वडाखाली बसलेली बॅटिंग टीमची पोरं हे दृश्य खडकीत दिवसभर दिसे . याच पटांगणात दसऱ्याला भला थोरला रावण जाळला जाई.
माझ्या सुट्ट्यांमध्येही आई ऑफिसला गेली रे गेली कि मी घरातून बाहेर पडे. सुरवातीला लहान असल्यामुळे मला बेट लावून खेळलेल्या मॅचेस मध्ये संधी मिळत नसे. वाईड चे दगड लाव, कोणाला लागलं वगैरे तर उगीच रनर म्हणून किंवा फिल्डिंगला उभं राहा किंवा लांब रस्त्यावरून पेप्सीकोला किंवा गोळा आणून दे हि कामे मला करावी लागत.
पण तरीही मी दिवसभर तिथे उमेदवारी करत असे. जवळपास सगळी मुलं पंधरा वर्षाच्या आतबाहेर, त्यामुळे दहा एक वर्ष वय असलेल्या मला “अरे घेतलं असतं तुला पण बॉलिंग फास्ट आहे, लागेल बॉल” किंवा “बेट लावली आहे यार, सिरिअस मॅच आहे” अशी करणं देऊन बाहेर ठेवलं जाई. पण क्रिकेटचं वेड आणि त्याकाळी टीव्हीवर दुपारभर काहीही नसणं यामुळं मी बहुदा तिथंच असे. एखाद्या अशाच “सिरिअस” मॅच बघण्याच्या नादात जेवणही हुकत असे, तेव्हा मग मी जिंकणाऱ्या टीमच्या पार्टीत वडापाव किंवा लोणचं पाव खाऊन, बंगल्यातल्याच नळावर पाणी पिऊन तिथंच टाइम पास करत असे.
आजूबाजूच्याच परिसरातील राजाबंगला, रेंजहिल्स, बोपोडी, मुळा रोड, खडकी बाजार इथल्या टीम्स बरोबर मॅचेस असत !
जनरली रविवारी आणि पब्लिक हॉलिडेजला अशा टीम्स मध्ये एक दोन बापे लोकं पण असत, यातले काही क्रिकेटचे दर्दी तर बाकी बेट फायनान्स करत त्यामुळे पोरांना यांना घ्यावेच लागे.
अशातलाच एक बाप्या म्हणजे श्री.
मी त्याला श्रीदादा म्हणत असे. बाकी सगळे त्याला तो त्यांच्या इतकाच असल्यासारखं श्री म्हणत ! त्याच्या उंचीमुळे आणि एकूणच तो कमीत कमी तिशीतला असल्यामुळे पोरांच्या टीम मध्ये उठून दिसे.
“इसको क्यूँ नाही लिया रे?” - श्रीने माझ्याकडे बोट दाखवून विचारलं
“भाय, छोटा है वो, बॉल लगा तो उसकी अम्मी सबको मारेगी” - सिक्कु (उर्फ सिकंदर) म्हणाला
“साले तुम लोग सिर्फ फिल्डिंग करवातें हो उस्से, ये मॅच में ले लो, एक कम है अपन के साईड "
“ए इधर आ, देखके खेलने का, बॉल नीचे और उपर लगेगा ऐसा आया तो बाजू होनेका”, डोकं आणि जांघेकडे बोट दाखवून श्री म्हणाला
“हो श्रीदादा” - दोन्ही ठिकाणी पूर्वी बॉल लागलेला असल्यामुळे मला त्याच्या अशा क्रूड बोलण्याचं अजिबात हसू आलं नाही
“उतर मग माझ्या संगट, कॉल दिल्याबगर पळायचं नाही, काय ?”
“हो, श्रीदादा”
श्री बरोबर मी त्यादिवशी नॉन स्ट्रायकर एन्ड ला डेब्यू(ट) केला, खाली किंवा वर बॉल कुठेही न लागता मी आठ दहा रन काढले आणि आमची पंचवीस एक रनांची पार्टनरशिप श्रीच्याच चुकीनं मी रन आउट झाल्यामुळे मोडली !!
थोड्या वेळानं आउट होऊन श्री पण वडाखाली येऊन बसला
“सिक्कु इसको अभी पर्मनंट करदे, फिल्डिंग तो अच्छा करता है, आज बॅटिंग भी मस्त किया !” “मला श्री म्हण, ह्या लोकांना दादा म्हणतो ते ठीके, जा चुना घेऊन ये टपरी वरून”
श्रीने आपला रिव्यू दिला आणि तंबाखू मळायला सुरु केलं.
मॅचनंतर सिक्कुनं, श्रीने हळू खेळत असल्याबद्दल मला मुद्दाम रन आउट केल्याच सांगितलं. तरी “सिरिअस” मॅच मध्ये माझं पदार्पण झालं या आनंदात असल्यामुळं मी ते काही मनावर घेतलं नाही
त्या सुट्टीत आणि पुढच्या अनेक सुट्यांमध्ये टीममध्ये मला पर्मनन्ट नाही तरी सेमी पर्मनंट स्थान मिळत गेलं.
बरा खेळत असल्यामुळं बऱ्याचदा सकाळीच पोरं बोलवायला येत आणि खेळ संपवून घरी यायला मला संध्याकाळ होई.
एका सुट्टीत आमच्या कॅप्टनशी भांडण (त्याच्या भाषेत - राडा) झाल्यामुळे श्री आमच्या विरुद्ध टीम कडून खेळायला लागला.
मी त्याला विचारलं त्याविषयी,
“अरे तेरे कॅप्टनने हमारी लाईन में एक लडकी को छेडा, लै हानला त्याला”
“तू भी हम लोगके साथ आजा, कॅप्टन लै गांडू आहे तुमचा”
पण टीम आमच्या कॉलनी ची आणि श्री तसा बाहेरचा असल्यामुळं मी तो प्रस्ताव स्वीकारला नाही !
आमच्या टीममध्ये नसल्यामुळे श्रीशी संपर्क तसा कमी होत गेला, कधी कधी आमच्या टीम विरुद्ध मॅच असेल तरच भेट होई आणि आता तो आमचा “दुश्मन” असल्यामुळे मला त्याच्याशी बोलायची बंदी असे
एखाद्या वेळेस रविवारी कटिंग सलून मध्ये भेट होई
“काय रे खेलता नही क्या आजकल ?”
“खेळतो,पण कमी असतो, क्लास लावलाय”
“हा अभ्यास कर, चांगली बायको मिळंल !”
कटींग वाले काका हसले,
आणि तो गेल्यावर मला, श्रीला घरात बायको दबून ठेवते असं सांगितलं
“रागीट आहे, पण याला सरळ ठेवते नाहीतर हा दिवसरात्र क्रिकेटच खेळंल!”
श्रीचं एकूणच क्रिकेट कमी होण्यामागचं कारण मला त्यादिवशी कळलं.
पुढच्या काही सुट्ट्या तर श्री भेटलाच नाही !
पण बॅक स्टोरी माहित असल्यामुळे मला त्याचं काही विशेष वाटलं नाही
“र्र्पाक !”
“भे**द उसने जान बुजके मारा”
“अरे उसको उठा पहले”
रन काढताना फिल्डर ने फेकलेला बॉल जोरात मांडीवर लागून मी धडपडलो होतो बॉल जोरात लागला होताच पण तोल जाऊन पडल्यामुळे सगळं अंग ग्राउंड मधल्या खडीवर किसून निघाले होते जोरात आदळल्यामुळे जरावेळ काही सुचतंच नव्हते हातापायांवर दोन तीन जखमांमधून रक्त वाहू लागले होते.
“ध्यानसे ध्यानसे”
एकानं काखेतून आणि दोघांनी पाय पकडून मला झाडाखाली आणलं
“ए पाणी पिला इसको”
“डेटॉल लेके आ”
आवाज ओळखीचा वाटतोय म्हणून वर पाहिलं तर !
श्री !!
“तू जा, हम लोग देख लेंगे, हमारा प्लेयर हैं”
सिक्कु श्रीवर ओरडला.
श्री फणकारला - “तेरेसे, झगडा करणे नहीं आया मै इधर - बामन मेरा भी दोस्त है”
मी सोफिस्टिकेटेड बोलतो म्हणून मला (नसताना) बामन असं पण म्हणत!
श्रीची तिथेच पडलेली सायकल घेऊन मग कोणीतरी डेटॉल घेऊन आला
“श्री, तू?”
“हा मुंबई में है आजकाल, तिकडं काम करतो”
“अभी निकला बाजार जानेको, तभी देखा तू गिरा”
आणलेलं सगळं डेटॉल माझ्या जखमांवर टाकताना श्रीचं चालू होतं
“येडे, सेप्टिक होता है माती अंदर रह गया तो”
“शाम को टिटनस का इंजेक्शन लेके आना, मेरेको बोल मैं आता तेरे साथ”
“अभी ये सुजेगा”
“खडा होजा, चालून दाखव, हा पैर नाही टूटा” “बॅट उठा, बॅट उठा, आता दुसऱ्या हातात ?”
“हातबी ओके आहे”
“बच गया तू !”
मी चांगलाच घाबरलो होतो
“आई मारेल आता हे बघितल्यावर”
“वो रिस्क है, मैं आऊ क्या बात करने ?”
“नको राहूदेत, क्रिकेट बंद आता थोडे दिवस”
“चलता है, आमचं तर कायमचं बंद झालं”
“का रे?”
“वय झालं निखिल, चालीस का हुआ ना मै इस साल!”
“खच्ची झालो यार आम्ही, अंदर से मन नहीं होता खेलनेका”
“आता तुमचा टाईम आला, आमी लोकं आता घर से काम तलक और वापस, तेच करणार जिंदगीभर”
“आमी गावस्कर, आमचं संपलं - तुमी तेंडुलकर, आता तुमची बॅटिंग”
श्री हसला, पण मला कससं वाटलं
माझ्यात जरा बळ येईतो श्री तसाच बसून राहिला
“तुला बाजारात जायचं नाही ?”
“बाल कटाने जा रेल्ला था रे, अर्जंट नाय काय !”
“मंग, पढाई करता है ना ?”
“करतो”
“चालू रख”
मी नाही नाही म्हणत असताना श्री त्यादिवशी सायकल वर बसवून मला घरी घेऊन आला आईला पण त्यानंच सांगितलं
“ताई, हाथ पैर तुटला नाही ते मेन, आता त्याला अजून मारू नको”
“जखम धोके लाया है, थोडा सुजेगा, इंजेक्शन लेके आना शामको”
ते पटल्यामुळे असेल कदाचित,
श्री गेल्यावर पण आई मला काही जास्त ओरडली नाही
मग काही दिवसांनी आम्ही खडकी सोडलं
सिक्कु, लाल्या, राक्या, केशव, झेवियर, फारूक, पप्पू आणि - क्रिकेट मागे पडलं
श्री नाही भेटला नंतर कधीच
कधीमधी ऑफिस ची कॅब जाते खडकीतून अगदी आमच्या ग्राउंड समोरूनसुद्धा एखादेवेळी, रिकामं पडलेलं असतं आजकाल.
एकदा तर मला लाल्या दिसला होता - सायकल वरून कुठेतरी निघालेला मिडल एज्ड वाटला - माझ्यासारखाच !
पण श्री नाही भेटला नंतर कधीच
पण कधीतरी कॅब मध्ये एखादा इंटर्न उगीच बोलणं सुरु करायला, “सर, देखा क्या मॅच कल ?” असं वाक्य टाकतो.
मग श्रेयस काय खेळला
सॅमसन ला पॉलिटिक्स करून कसं बाहेर ठेवलंय आणि विकेंड ला टर्फवर किती मजा आली, वगैरे वगैरे सांगत असतो …
मला यातलं काहीच कळत नाहीये असं वाटून मग तो मला चांगलं वाटावं म्हणून विचारतो -
“आप खेलते नहीं ? क्यों नही आते टर्फपे ?”
आणि मला त्याला एकच सांगायचे असते …
“आमचा खेळायचा टाईम गेला यार आता तुमचा टाईम !”
पण
मी, “अरे दूर पडता है टर्फ, आजकल ट्रॅफिक क्या है पुणेमे !” - असं म्हणून वेळ मारून नेतो.
कधी वाटतं -
आता जशी मास्टर्स लीग होते तशी माझ्या मिडल एज्ड मित्रांची एक खडकी मास्टर्स लीग घ्यावी
सिक्कु आणि श्रीला एकत्र परत आणावं - एकाच टीम मध्ये !
बेट लावून बोपोडी, रेंज हिल्स किंवा राजाबंगल्याचा टीम शी एखादी मॅच ठेवावी
आणि श्री बरोबर ओपनिंग ला उतरावं !
“सर, ओटीपी ?”
ड्रायव्हरच्या प्रश्नानं मी भानावर येतो.
मन जुन्या कॉलनीतल्या घरात, परिसरात रेंगाळत असलं,
तरी मी आताच्या घरी येऊन पोचलेलो असतो.
श्री आणि माझे इतर मित्र त्यांच्या बाकी आयुष्यात कसे होते आणि आता त्यांचं काय चाललंय -
हे मला बहुतेक कधीच कळणार नाही … पण,
वय वाढतंय तसं - “आम्ही खच्ची झालो”
या वाक्यामागचा विषाद मात्र थोडा थोडा कळू लागलाय …
-निखिल